संपर्क
०२०-२६३८००२३/२८
+९१-९४०३२५२०८१
र.नं.पी.एन.ए./आर/एस/आर./४०२, सन १९८१, ३१/०७/१९८१
"अर्थस्यो पुरुषो दास:" माणूस पैशाचा गुलाम असतो किंवा दाम करी काम असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ माणसास पैशाची नितांत गरज असते. पैशामुळे माणसाच्या बऱ्याच अडचणी, समस्या दुर होतात. त्याचे आयुष्य सुखकर होऊन सर्व भौतिक सुख तो प्राप्त करून घेऊ शकतो.
परंतु सामान्यांना खुप कष्ट करून बचत करून सुद्धा आपल्या गरजेच्या वेळी पैसा उपलब्ध होत नाही. ही सर्व सामान्यांची समस्या लक्षात घेऊनच श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन समाजाच्या एका द्रष्ट्या, मुत्सद्दी समाज सेवकाने व व्यापारी मित्रांनी मिळून १९६३ मध्ये "क्षत्रिय व्यापारी संघ" नावाची संस्था स्थापन केली ते द्रष्टे व्यक्ती म्हणजे कै. शंकरसा बाबासा शालगर (उर्फ शं. बा.) त्यांच्या या कार्यामध्ये कै. जगन्नाथसा टाक, कै. मनोहरसा जितुरी, कै. व्यंकटसा कमलापुरे, कै. महादेवसा खोडे, कै. शशिकांतसा मैत्राणी, श्री. चंदुलालसा बारड व श्री रमाकांतसा खोडे इत्यादी व्यापारी व सर्व समाजबांधवांनी मोलाची साथ दिली.
या संघाची कार्यक्षमता, तत्परता व पारदर्शक व्यवहार पाहून वेळोवेळी आणखी काही व्यापारी मित्र त्यात सहभागी झाले. संघाचा कारभार व सभासद संख्या वाढली त्यामुळे संघाच्या सूत्रधारांनी आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले व ३१ जुलै १९८१ रोजी सदर व्यापारी संघाचे "श्री सहस्त्रार्जुन नागरी सहकारी पतसंस्थे"मध्ये रुपांतर केले. ही प्रगती पाहून पुणे ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष कै. दत्तुसा विठ्ठलसा वाळवेकर यांनी ट्रस्टच्याच “६२, गंज पेठ” येथील जागेत पतसंस्थेचे कामकाज करण्यास आनंदाने संमती दिली. संस्थापक अध्यक्ष कै. शं. बा. शालगर यांचे अकाली निधनानंतर बसलेल्या धक्क्यातुन सावरून कै. मनोहरसा कृ. जितुरी यांनी अध्यक्षपदाची व कै. शशिकांत मैत्राणी यांनी सचिवपदाची धुरा सांभाळून पतसंस्थेचा कारभार सावरला.
पतसंस्थेचा कारभार दिवसेंदिवस वाढू लागला त्यामुळे ६२ गंज पेठ येथून संस्थेचे स्थलांतर “देडगांवकर सदन” येथे झाले. संस्थेचा कर्मचारी वर्ग वाढला, सभासद संख्या वाढली लाखाचे व्यवहार कोटीमध्ये पोहचले. संस्थेला स्वतःच्या मोठ्या वास्तुची गरज भासू लागली. प्रगतीकडे वाटचाल करत महात्मा फुले पेठेतील जन्नु अपार्टमेंट येथे स्वतःच्या जागेत संस्था स्थिरावली. संस्थेच्या उत्कर्षामध्ये अनेकांनी मोलाची साथ दिली.
पतसंस्थेच्या व्यवहारात आधुनिकता व सभासदांना सुलभता प्राप्त व्हावी यासाठी नवीन जागेत स्थलांतर होताच सर्व व्यवहार संगणीकृत करण्यात आले. संगणकीकरण करण्याबाबत आपली पतसंस्था अग्रगण्य आहे. सभासदांच्या कर्जाची मागणी ओळखुन व अनेक मोठ्या बँकाशी स्पर्धा करताना पतसंस्थेचे हित लक्षात घेवुन नवनवीन योजना तयार केल्या गेल्या.
सभासदांच्या सोयीसाठी कार्यकारी मंडळातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक हे नित्य नेमाने दर सोमवारी व गुरुवारी संस्थेच्या कार्यालयात उपस्थित असतात. सभासदाच्या अडचणीबाबत प्रत्यक्ष चर्चा करून वेळोवेळी योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच दर महिन्याला कार्यकारी मंडळाची एक सभा संस्थेच्या कार्यालयात घेतली जाते, त्यामध्ये अजेंड्यावरील सर्व विषयांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जातो. कार्यकारी मंडळातील सर्वजण निष्ठेने समाजसेवेचे व्रत घेतलेल्या भावनेने पतसंस्थेचे कामकाज करत असतात. इतक्या वर्षानंतर पतसंस्थेच्या इवल्याश्या रोपट्याचे रुपांतर आज एका मोठ्या वृक्षात झाले आहे. ६०-७० सभासदांपासून सुरु झालेल्या पतसंस्थेचे आज २८०० सभासद आहेत. फक्त रु. ४० हजार वार्षिक उलाढालीपासून सुरु झालेल्या संस्थेने आज जवळ जवळ १२ कोटीचे उलाढालीपर्यंत पल्ला गाठला आहे. सभासदांचा पाठींबा, कार्यकारी मंडळ व सेवकवर्गाचे निष्ठापुर्ण प्रामाणिक कष्ट, संस्थेबद्दल असलेला जिव्हाळा यातूनच पतसंस्था भविष्यकाळात खुप प्रगती करेल असा पूर्ण विश्वास सर्वांनाच आहे.
क्र. | नाव | कार्यकाळ सन |
---|---|---|
१ | कै. शंकरसा बाबासा शालगर | १९८१ ते १९८२ |
२ | कै. मनोहरसा कृष्णासा जितुरी | १९८२ ते १९८७ |
३ | कै. दत्तुसा उद्धवसा रोडगे | १९८७ ते १९९३ |
४ | कै. शशिकांतसा रामकृष्णसा मैत्राणी | १९९३ ते १९९५ |
५ | श्री. अशोकसा विठ्ठलसा चव्हाण | १९९५ ते २००६ |
६ | श्री. हेमंतसा चंद्रकांतसा खेरुड | २००६ ते २०१६ |
७ | श्री. राजेंद्रसा दत्तुसा वाळवेकर | २०१६ ते २०१८ |
७ | श्री. नितीनसा पुरुषोत्तमसा चावंडे (विद्यमान अध्यक्ष) | २०१८ पासून |